.
RTE प्रवेश प्रकरणी न्यायालयात उद्या ११ जुलैला अंतिम सुनावणी?
राज्यातील लाखो पालक RTE २५% राखीव जागेसाठी होणाऱ्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्य शिक्षण विभागाने RTE कायद्यात केलेल्या बदलामुळे काही सामाजिक संघटना व पालक यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते व न्यायालयाने या बदलावर स्थगिती दिली होती. त्या नंतर शिक्षण विभागाने पुन्हा नव्याने ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती व याचा लकी ड्रॉ (सोडत) दिनांक ७ जून २०२४ रोजी झाली होती परंतु या सोडतीचा निकाल हा दिनांक १२ जून रोजी न्यायालयीन निकाला नंतर जाहीर होणार होता परंतु काही कारणास्तव ही न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलली होती.
पुढे ढकलेली सुनावणी ही उद्या दिनांक ११ जुलै रोजी होणार असून राज्य भरातून RTE प्रवेश अर्ज केलेल्या लाखो पालकांचे लक्ष उद्या होणाऱ्या या सुनावणीवर आहे. नेमका उद्या न्यायालयात काय निकाल लागणार या कडे सर्व पालकांचे लक्ष आहे. सद्या चालू असलेल्या या न्यायालयीन प्रक्रिये मुळे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
RTE प्रवेशाची सोडत लॉटरी जाहीर झाल्या नंतर शिक्षण मंडळाने प्रवेशाची यादी तयार केली आहे. येत्या ११ जुलैला न्यायालयात अंतिम सुनावणी होईल आणि १२ जुलैला प्रवेशाची यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी यांनी दिली आहे.त्यामुळे आता RTE प्रवेश प्रक्रियेसाठी १२ जुलैला मुहूर्त लागेल अशी अपेक्षा आहे.
RTE प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्याला संधी मिळेल या आशेने अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अद्याप कोठेही घेतलेले नाहीत. तसेच इंग्लिश व मराठी माध्यमांच्या शाळा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आहे. जर आपल्या पाल्याची प्रवेशाची संधी दोन्हीकडून ही हुकली तर त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच आता १२ जुलै नंतर वेळ वाया न घालवता शिक्षण विभागाने तातडीने ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणीही पालकांसह संघटनांनी केली आहे.