खेड्याला शहरापर्यंत जोडणारी जीवनवाहिनी एस टी चा आज ७६ वा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे.
MSRTC Anniversary १ जून एस टी (लालपरी) चा ७६ वा वर्धापन दिन!
.
१ जून १९४८ रोजी सूरवात झाल्या पासून दर वर्षी एस टी चा वर्धापन दिन साजरा होत आहे आज १ जून २०२४ रोजी एस टी ७६ वर्षाची झाली असून ७६ वा वर्धापन दिन महाराष्ट्रभर सर्वच बसस्थानकावर प्रवाशी व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून तसेच शुभेच्छा देऊन साजरा केला जाणार आहे.
लालपरी म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत आपलीशी वाटणारी. खेड्या पासून शहराला जोडणारी जीवनवाहिनी. पुणे – अहील्यानगर (अहमदनगर) मार्गावर १ जून १९४८ रोजी एस टी ची पहिली बस धावली आणि त्या दिवसापासून एस टी च्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आता सर्वत्र महाराष्ट्रभरच नव्हे तर अनेक राज्य एस टी प्रवास करत आहे. केवळ ३२ बेडफोर्ड बसेस पासून सुरू झालेला हा प्रवास आज ७६ वर्षात १५ हजार बसेस पर्यंत पोहचला आहे. या बसेस च्या माध्यमातून महाराष्ट्रभर ५६० पेक्षा ही जास्त बसस्थानकातून रोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते आहे.
महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, तसेच पत्रकार अशा ३० पेक्षाही जास्त समाज घटकांना एस टी च्या प्रवाशी सेवेमध्ये राज्य शासन मार्फत सवलत दिली जात आहे. तसेच शालेय सहली साठी पण विशेष सवलत देण्यात येत आहे. याबरोबर दिवाळी, गणेश उत्सव, आषाढी, कार्तिकी यात्रा, अशा अनेक सणावाराच्या निमित्ताने नियमित तसेच ज्यादा फेऱ्याचे नियोजन करून प्रवाशांची सोय करत आहे. तसेच लग्न समारंभ, विविध शासकीय मोहत्सव व मेळावे यासाठी देखील सेवा पुरवते आहे.
दिवसेदिवस एस टी देखील कात टाकत चालली असून डिजिटल जगाबरोबर नवनवीन सेवा व सुविधा देत आहे. आत्ताच मागील काही दिवसामध्ये एस टी ने अँड्रॉइड तिकीट मशीन आणल्या असून यामध्ये UPI पेमेंट ची सुविधा चालू केली आहे तसेच ऑनलाइन आरक्षण करण्याची देखील सुविधा चालू आहे.
लालपरीचा रंजक इतिहास
देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा स्वतंत्र कारभार सुरु होऊन एक वर्षही झाले नव्हते. त्याच काळात नवीन ध्येय-धोरणे आखली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून खासगी वाहतूक व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावेळी बॉम्बे स्टेट होते. १ जून १९४८ रोजी अहमदनगर माळीवाडा येथील लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाला मोठी घंटा बांधली होती. बेडफोर्ड कंपनीची ३० आसन असलेली बस पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली. बसवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. झाडावरची घंटा वाजली आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतूक सेवेला सुरुवात झाली. अहमदनगर ते पुणे पहिल्या बसचे प्रवास भाडे आठ आणे होते. अहमदनगर-पुणे मार्गावर धावलेल्या पहिल्या बसचे पहिले चालक श्री. किसनराव राउत तर पाहिले वाहक श्री. लक्ष्मण केवटे हे होते.
एकदम सुरुवातीला एसटीच्या ताफ्यात फोर्ट, शेवरलेट, बेडफोर्ड, सेडॉन, स्टुडबेकर, मॉरिस कमर्शियल, अल्बियन, लेलँड, कमर आणि फियाट अशा १० बसेस होत्या. १९५०च्या दशकाच्या सुरुवातीस, मॉरिस कमर्शियल चेसिससह दोन लक्झरी कोच दाखल झाल्या. त्यांना नीलकमल आणि गिर्यारोहिनी असे म्हणत. सन १९५० मध्ये केंद्राने रस्ता परिवहन महामंडळ कायदा पारित केला आणि महाराष्ट्रात बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन (बीएसआरटीसी) अस्तित्वात आले. राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर याचे एमएसआरटीसी (MSRTC) मध्ये रुपांतर झाले. काळाच्या ओघात एसटी देखील बदलत गेली. ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनवाहिनी झाली.